चष्म्याबद्दल रोखठोक! – डॉ निशिता बेके-बोर्डे

Eye Specialist in Swargate, Sinhagad Road & Parvati Pune

“डॉक्टर,केवढा नंबर आहे हा! एवढ्या लहान वयात? कशाला??कधी जाईल?”

“त्या डॉक्टरांनी -4 दिला आहे, तुम्ही कमी करून द्या.
आमच्या घराण्यात कुणालाही नाही चष्मा,ह्याला कसा काय असू शकतो, शक्यच नाही.”

“मागच्या वेळेला -3 होता , आता कसा काय -3.5 झाला?”

“Screen time शून्य आहे तिचा, कसा काय चष्मा लागेल?”

“हंss, भोगा आता, बघा अजून मोबाईल, लागला ना चष्मा? तुम्हीच सांगा काहीतरी , आईबाबा उगीच ओरडतात असं वाटतं त्याला! ”

“Injection च द्या डोळ्यात, असा कसा काय चष्मा लागतो, mobileच तो अजून दुसरं काय! आपल्या लहानपणी कुठे होतं असलं काही!नसायचाच चष्मा कुणाला!”

“डॉक्टर घरचे ऐकत नाहीत, मुलीच्या जातीला चष्मा नको म्हणून तुमच्याकडे यायचंच नाही म्हणतात, १५ दिवस भांडून शेवटी आज करमाळ्यावरून पहाटे एकटीच घेऊन आले बघा हिला!”

अगदी रोज ऐकू येणाऱ्या या प्रतिक्रिया आणि त्यांना तोंड देऊन देऊन थकलेली मी आणि पुढे बसलेले पाणावलेले छोटे छोटे डोळे आणि पडलेला चेहरा!

मुळात चष्मा हे काही व्यंग नाही, हे आपण जाणून घ्यायला पाहिजे. मुलांना चष्मा असणे म्हणजे कमीपणाचे लक्षण नव्हे, उलटपक्षी आपण त्यांना जग स्वच्छ दाखवत आहोत आणि ते स्वच्छ दिसणे हा त्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे!
डोळ्याला नंबर लागणे हे पूर्णपणे डोळ्याच्या ठेवणीवर अवलंबून असते, त्याचा आकार, लांबी आणि त्यात वयापरत्वे होत जाणारे बदल यावर सगळं काही अवलंबून आहे, जे कुणाच्याच हातात नाही, ना patient च्या, ना आमच्या! अर्थात सतत केली जाणारी near activity म्हणजेच excessive screen time, अति वाचन हे असलेला minus नंबर वाढवण्यास कारणीभूत ठरतं. पूर्वीच्या काळात जास्त अभ्यास करणाऱ्या मुलांना चष्मे लागायचे असं दिसायचं, त्याचं कारण बहुतांशी हेच! कुठलाही healthy juice पिऊन (अगदी गाजराचा सुद्धा!) किंवा vitamin ची औषधे घेऊन नंबर घालवता येत नाही. त्यामुळे आहे त्या वयात डॉक्टर सांगत असूनसुद्धा केवळ आपल्याला मान्य होत नाही म्हणून मुलाला चष्मा लावू द्यायचा नाही म्हणजे स्वतःच त्याचं नुकसान करण्यासारखं आहे!

स्वतः दोघेही आई वडील जाड भिंगाचे चष्मे लावून मुलाला चष्मा लागताच त्याला आरोपीच्या कटघऱ्यात इतक्या लगेच उभे करतात की बोलता सोय नाही! डॉक्टर त्यावर काही वक्तव्य करायच्या आधीच मुलाच्या so called पापाचा घडा आमच्यासमोर रिकामा झालेला असतो.थोडासा मुलांच्या मानसिकतेचा विचार करायला नको का?
मुळातच चष्मा म्हणजे वाईटच असं आपण मुलांच्या मनावर बिंबवतोय असं वागून!मुलांना चष्मा लागण्याबरोबरच तो त्यांनी regularly वापरणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. ते काढायची घाई का? चष्म्याअभावी कुणाला तिरळेपणा, कुणाला सारखी सारखी येणारी रांजणवाडी असे प्रकारही घडतात. पण भारतीय मानसिकता ही “आपल्याला काही झालेच नाही आणि डॉक्टर उगाच फिया घेऊन लुबाडतात” यातून बाहेर आलेलीच नाही. चष्मा जाईल/ नाहीच असं सांगणारा डॉक्टर तो चांगला कारण तो अशा पालकांचा ego satisfy करतो. मी अत्यंत स्पष्ट बोलतेय पण या ego मुळे आणि मानसिकतेमुळे ज्या वयात मुलांना स्पष्ट दिसून नजर तयार व्हायला पाहिजे तेव्हा ती होत नाही आणि amblyopia (आळशी डोळा) व्हायचे प्रमाण वाढलेले आहे! त्याला screen कारणीभूत नाही! त्याला आपली पालक म्हणून असलेली मानसिकता आणि अनास्था जबाबदार आहे!
“छे! इतक्या लहान वयात काय करायचेत डोळे तपासून! उगाच बोलावतात सारखं सारखं” ही मानसिकता आहे!
आपल्या पाल्याला पुढे कुठे कमी पडू नये म्हणून बक्कळ investment आणि bank balance ठेवणारे आजकालचे सगळेच पालक आहेत, पण त्यांच्या आरोग्याचे काय? जे वाढीचं वय आहे, त्यात इलाज व्यवस्थित झाले नाहीत, तर नंतर ते करायला मर्यादा येतात किंवा कधीकधी होतही नाहीत! चष्मा असेल तर तो त्याच वयात लावावा लागतो आणि वारंवार चेक ही करत राहावं लागतं कारण नंबर बदलत जातात.

चष्मा लावल्याने मुलांचा आत्मविश्वास दुणावतो कारण जग स्पष्ट दिसायला लागतं.फळ्यावरचे स्पष्ट दिसल्याने झालेली अभ्यासातील प्रगती, खेळातील वावर, खेळात मारायचे shots, वक्तृत्व स्पर्धेत श्रोत्यांशी होणारा “connect” हे सगळंच अधिक आत्मविश्वासाने होतं कारण सगळं स्पष्ट दिसतं.
+8, -10 असे नंबर असलेली आणि कधीही डोळे न तपासलेली अनेक मुलं आम्ही पाहतो.शिक्षकांच्या नजरेत आणि वर्गमित्रांच्या तुलनेत मागे पडलेली असतात, काही अतिचंचल बनतात. नक्की कारण काय हे न कळल्याने आईबाबा , आजी आजोबा हैराण झालेले असतात.प्रसंगी डोकेदुखीसाठी अनेक औषधे, काढे करून झालेले असतात. मूल 3-4 वर्षांचे असल्यास या मुलांना सांगताही येत नाही की मला स्पष्ट दिसत नाही. थोडे मोठे असल्यास ते पालकांच्या भयावह प्रतिक्रिया जाणून असतात, त्यामुळे बोलायला धजावत नाही, मग एक दिवस शाळेतून note येते, डोळे तपासून घ्या!

मुलांना चष्मा लागल्यास आपण त्यांना धीर देणं जास्त गरजेचं आहे, त्यांना विश्वासात घेणं महत्वाचं आहे, त्यांच्या मनात अपराधी भावना निर्माण करून काहीही साध्य होणार नाही.चष्मा तुटणार, खराब होणार हे आपल्याला मान्य केलं पाहिजे, त्यांना त्याची काळजी घ्यायला शिकवलं तर अनेक मुलं 2 वर्षे कमीत कमी same frame वापरणारी पाहिली आहेत. पण त्या चष्म्याविषयी आपले पालक एवढे नाराज असतील तर मुलाचा राग काहीही झालं तरी चष्म्यावरच निघणार आहे, हे काही वेगळं सांगायला नको!

विषय सोपा आहे पण आपण त्याचं अवडंबर करायचं ठरवलं तर अवघड आहे, बघा विचार करून!

डॉ निशिता बेके- बोर्डे
MBBS MS DNB FPOS
बालनेत्ररोगतज्ञ
पुणे